संपादकीय
महाराष्ट्र फाउंडेशनचे गेल्या शतकातील प्रख्यात बुद्धिप्रामाण्यवादी कृतिशील विचारवंत र.धों. कर्वे यांच्यावरील हे संकेतस्थळ ३० मे २०२२ पासून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते मराठी वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठी खुले करीत आहोत. दर वर्षी साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रांतले पुरस्कार देणाऱ्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)चा हा महत्त्वाचा उपक्रम. या संस्थेचे आणि बुद्धिवादाचे / विवेकवादाचे अगदी सुरुवातीपासूनच नाते राहिलेले आहे. त्यांनी जुलै १९२७ साली ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक सुरू केले. पहिल्याच अंकात त्यांनी आपला उद्देश स्पष्ट केलेला होता –
‘व्यक्तींच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयासंबंधी लेख इतर पत्रकार छापत नाहीत असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्यासंबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकांस अतिशय अडचण पडते. ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. यात तत्त्वज्ञानाचा खल न करता व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल.
‘कामशास्त्र ‘ या शब्दाचा दुरुपयोग झालेला आहे, तरीही ‘कामवासनेचा शास्त्रीय दृष्टीने विचार ‘ अशा अर्थाने हा शब्द वापरणे आम्हांस भाग पडत आहे. याबद्दल कोणासही क्षुब्ध होण्याचे कारण नाही .’
र.धों.नी या अंकांमधून लैंगिक प्रश्नांची उघडपणे चर्चा केली. फक्त प्रश्नांची चर्चा नाही तर लैंगिक संबंधातून मिळणाऱ्या आनंदाचीही चर्चा केली. स्त्रियांना लैंगिक आनंद घेण्याचा हक्क आहे, स्त्रियांना फक्त समानताच नव्हे तर लैंगिक स्वातंत्र्याचाही हक्क आहे, हे र.धों.नी कमालीच्या धाडसाने मांडले. आज शंभर वर्षानंतरही हे विचार भारतीय समाजाला मान्य होतील की नाही, याविषयी शंकाच आहे. कामशास्त्राच्या अनुषंगाने येणाऱ्या स्त्रीसुलभ (?) विनय, लज्जा, व्यभिचार, संतती नियमन, संतती नियमनाची साधने अशा कितीतरी विषयांवर त्यांनी निर्भिडपणे लेखन केले. संतती-नियमनाचा सल्ला देणारे केंद्र उघडले आणि संतती- नियमनाच्या साधनांच्या ‘समाजस्वास्थ्य’च्या अंकांतून उघडपणे जाहिराती प्रसिद्ध केल्या आणि त्यांची विक्रीही केली. त्यांच्या पत्नी मालतीबाई यांची त्यांच्य़ा या कार्याला साथ होती. त्यांनी त्या काळात ‘आळीमिळी गुपचिळी’ असणाऱ्या या विषयावर जी वैचारिक चर्चा ‘समाजस्वास्थ्य’च्या अंकातून केलेली आहे, ती आजही भल्याभल्या विद्वानांच्या डोक्याला झिणझिण्या आणणारी आहे.
एकेकाळी बौद्धिक क्षेत्रांत आघाडीवर असणारा, सबंध भारताचं राजकीय, वैचारिक, सामाजिक नेतृत्त्व करणारा महाराष्ट्र आज बुद्धीशी काही संबंध नसल्यासाऱखाच वागतो आहे. आजच्या बुद्धिमांद्य आलेल्या महाराष्ट्राला वैचारिक जाग आणायची असेल तर र.धों.च्या खणखणीत बुद्धिप्रामाण्यवादी विचारांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र फाउंडेशन ‘समाजस्वास्थ्य’चे दुर्मिळ झालेले अंक मूळ स्वरुपात, कोणतेही संपादकीय संस्कार न करता या संकेतस्थळावर वाचकांना उपलब्ध करून देत आहे. र.धों.शी आणि त्यांच्या बुद्धिवादाशी असलेले आमचे नाते अधिक दृढ करण्याचा आमचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या या वैचारिक, बौद्धिक, सामाजिक अशा अभिमानास्पद परंपरेचा जुन्या-नव्या पिढीला नव्याने परिचय घडावा, हाही त्यामागचा आमचा हेतू आहे.
सुरुवातीला आम्ही ‘समाजस्वास्थ्य’चे सर्व अंक जसेच्या तसे, यथामूल स्वरुपात उपलब्ध करून देतो आहोत. खेरीज आम्ही विषयानुरुप सूचीही देतो आहोत. पुढे र.धों.चे इंग्रजी लेखनही मिळवून ते या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यांच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट करणारे काही अभ्यासपूर्ण लेखही पुढे आम्ही देऊच पण आहे या स्वरुपातही हे संकेतस्थळ परिपूर्ण आहे आणि वाचकांना बरेच काही देणारे आहे.
संकेतस्थळांबाबतच्या आपल्या सर्व सूचनांचे सदैव स्वागतच आहे.
र.धों.च्या कार्यातील त्यांच्या सहकारी शकुंतलाबाई परांजपे यांनी समाजस्वास्थ्याचे सारे अंक (त्या काळातील) पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाला खूप वर्षांपूर्वीच भेट दिलेले होते. हे अंक महाराष्ट्र फाउंडेशनच्या संकेतस्थळावर उपलब्ध व्हावेत, यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाचे तेव्हाचे उपाध्यक्ष (‘नॅक’चे विद्यमान अध्यक्ष) डॉ. भूषण पटवर्धन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांची मोलाची मदत झाली आहे. समाजस्वास्थ्यचे काही अंक डॉ. समीर कुलकर्णी यांनीही उपलब्ध करून दिले. संकेतस्थळाचे काम आम्ही एमकेसीएल (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) या संस्थेच्या मदतीने सुरू केले. एमकेसीएल संस्थेच्या स्थापनेपासून व्यवस्थापकीय संचालक राहिलेले आणि आता मुख्य सल्लागार असलेले डॉ. विवेक सावंत आणि एमकेसीएलचे मुख्य संचालक आणि अधिकारी उदय पंचपोर यांनी संकेतस्थळ आकाराला यावे म्हणून पुढाकार घेतला. परंतु करोनाने एमकेसीएलचा कर्मचारी वर्ग कमी झाला, कार्यालय बंद झाले त्यामुळे त्यांचाही नाइलाज झाला. मग संगणकतज्ञ आणि संपादक सुश्रुत कुलकर्णी यांनी ‘निम्बल इ-सोल्यूशन’ संस्थेच्या नीता जोशी यांचे तांत्रिक साहाय्य घेऊन हे काम पूर्ण केले. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार योजनेचे संकेतस्थळ निम्बल इ-सोल्युशन या संस्थेनेच तयार केलेले आहे. या सर्वांचेच मनःपूर्वक आभार.
महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या उपक्रमाविषयी
सामाजिक परिवर्तनाचा पुरस्कार करण्याच्या जाणिवेतून महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने र.धों. कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ची वेबसाइट तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्राला प्रागतिक विचारांची आणि सामाजिक सुधारणांची मोठी परंपरा आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, आगरकर, महर्षी कर्वे, महर्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील अशा समाजसुधारकांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि लेखणीद्वारे ही परंपरा निर्माण केलेली आहे. ही उज्ज्वल परंपरा साहित्यातून आणि सामाजिक कार्यांतून अशीच पुढे चालू राहावी, तिला उत्तेजन मिळावे आणि तिचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने अमेरिकास्थित सुनील देशमुख यांनी १९९३मध्ये दोन कोटी रुपये महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांना देऊन एक पुरस्कार योजना सुरू केली.
महाराष्ट्र फाउंडेशनची स्थापना १९७८ साली रॉचेस्टर, न्यूयॉर्क इथे झाली. कै. यशवंत कानिटकर आणि त्यांचे मित्र अशा एकूण दहा मराठी कुटुंबांनी मिळून ही संस्था सुरू केली. त्यांच्यावर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम या संतांचा आणि लोकमान्य टिळक, आगरकर, महर्षी कर्वे, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर या समाजसुधारकांचा प्रभाव होता. श्री. सुनील देशमुख या पुरस्कार योजनेला फक्त पैसे देऊन थांबले नाहीत, तर या पुरस्कारांचे निकष काय असतील, ती योजना पारदर्शकपणे आणि लोकशाही पद्धतीने कशी राबवली जाईल, याकडे त्यांनी लक्ष पुरवले. महाराष्टातले सच्चे समाज कार्यकर्ते आणि सामाजिक जाणीव असणारे साहित्यिक पुरस्कार निवडीच्या समितीवर राहतील, याचीही त्यांनी काळजी घेतली.
आजही समकालीन वास्तवाशी, नवनवीन सामाजिक समस्यांशी आणि आव्हांनाशी आणि त्यांच्या नवनव्या अभिव्यक्तींशी पुरस्कारांचे सततचे नाते राहिले पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो. जातीपातींचे निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीशिक्षण आणि स्त्री सुधारणा, स्त्री-अत्याचार निर्मूलन, स्त्रियांचा सन्मान, लिंगभेद निर्मूलन, हुंडा-विरोध यांसारख्या मानवतावादी आणि उदारमतवादी चळवळींत प्रत्यक्ष काम करणारे आणि त्या-त्या क्षेत्रांमध्ये लेखणी चालवणारे यांना पुरस्कार देण्याची ही योजना आहे.
र.धों. कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाद्वारे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या, परंतु दुर्लक्षित विषयाला वाचा फोडली. या वेबसाइटवर समाजस्वास्थ्यचे सर्व अंक मूळ स्वरूपात उपलब्ध करून दिले असून अभ्यासकांना ते उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.


























