लोकशिक्षण आणि प्रबोधन या हेतूने र. धों. कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ मासिक सुरू केले होते. जुलै १९२७ मध्ये ‘समाजस्वास्थ्या’चा पहिला अंक निघाला. या अंकाच्या प्रस्तावनेत मासिक सुरू करण्यामागचा आपला उद्देश रघुनाथरावांनी सांगितला होता.
‘व्यक्तींच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयासंबंधी लेख इतर पत्रकार छापत नाहीत असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्यासंबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकांस अतिशय अडचण पडते. ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. यात तत्त्वज्ञानाचा खल न करता व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल.’
ज्या काळी, लैंगिक समस्या, संततिनियम, लैंगिक स्वातंत्र्य याविषयी माहिती तर सोडाच, पण असे शब्द उच्चारलेही जात नसत त्या काळी या विषयांची सांगोपांग चर्चा करणारे हे मासिक सतत २६ वर्षे चालवणे ही सोपी गोष्ट नव्हती. र.धों. कर्वे या अवलियाने ही जबाबदारी जवळजवळ एकहाती पेलली होती. या मासिकातून त्यांनी आपले प्रखर बुद्धिवादी विचार मांडले होते, लैंगिक स्वातंत्र्याचा हिरिरीने पुरस्कार केला होता आणि संततिनियमनाचे सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य असले पाहिजे असे प्रतिपादन ते करत असत. अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, सदराचा किंवा इतर वस्तूचा गुण नसतो, तो फक्त तसा आरोप करणाऱ्याच्या मनाचा गुण आहे, हे ते सतत ठासून सांगत असत.
प्रगत सामाजिक जाणीव आणि सामाजिक सुधारणा यांचा सतत पुरस्कार करत आलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने र.धों. कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ची वेबसाइट तयार करण्यात आली आहे. समाजस्वास्थ्यचे सर्व अंक इथे मूळ स्वरूपात उपलब्ध करून दिले असून अभ्यासकांना ते उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.


























