र धों आणि स्त्री-लैंगिकता :- अंजली जोशी

संततिनियमनाचे भारतातील आद्य पुरस्कर्ते म्हणून र. धों. कर्वे यांचे नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहे. १९२१ मध्ये पत्नी मालतीबाईंसमवेत भारतातले पहिले संततिनियमन केंद्र चालू करून त्यांनी या कार्याची मुहुर्तमेढ रोवली. त्यानंतर १९२७ मध्ये समाजस्वास्थ्य हे मासिक चालू केले. हे मासिक, ग्रंथलेखन व केंद्राद्वारे मार्गदर्शन व साधने पुरविणे अशा सर्व आघाड्यांवरून १९५३ पर्यंत म्हणजे सुमारे पंचवीस वर्षांपेक्षाही जास्त कालावधीपर्यंत या कार्याचा आलेख त्यांनी उंचावत नेला. एखादे कार्य दीर्घकाळ चालू ठेवावयाचे असेल तर त्या कार्याबाबत नुसती आस्था किंवा कळकळ असणे पुरेसे नसते, तर त्यासाठी सैद्धांतिक बैठक पक्की असावी लागते. रधोंनी अंगिकारलेली विवेकवादाची बैठक इतकी भक्कम होती की हे कार्य पुढे नेण्यास पदोपदी येणार्‍या अडचणी व विरोध यांना ते समर्थपणे तोंड देऊ शकले.

रधोंचे मुख्य बलस्थान म्हणजे त्यांची लेखणी. त्यांनी लेखणीची तलवार एकदा परजण्यास सुरुवात केली की ती भल्याभल्यांना गारद करत असे. अत्यंत रोखठोक, मर्मभेदी, तर्कशुद्ध, अशी त्यांची भाषा दांभिकतेबद्दलची चीड उफाळून आली की तिरकस व बोचरीही होत असे. रधोंच्या लेखणीने फक्त संततिनियमनाचेच विषय हाताळले नाहीत, तर साहित्यापासून ते अनेक सामाजिक विषयांना तिने स्पर्श केला. त्यांचे सर्वात उल्लेखनीय लिखाण म्हणजे कामशास्त्रावरील लिखाण होय. संततिनियमनाचा गाभा म्हणजे ‘निकोप स्त्री-पुरुष कामसंबंध’ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा व अभ्यासाचा विषय होता. १०० वर्षांपूर्वी जेव्हा ‘लैंगिकता’ हा शब्द उच्चारण्यास पुरोगामी लोकही बिचकत होते, अशा समाजात या विषयाची खुलेपणाने चर्चा केल्याशिवाय त्याबद्दलचे अडसर दूर होणार नाहीत, हे त्यांनी जाणले होते. समाजस्वास्थ्य मासिकात ते म्हणतात,१ ‘या मासिकात लैंगिक विषयांना प्राधान्य मिळाले आहे, याचे कारण स्वत:ला बुद्धिवादी म्हणवणारे लोकदेखील या एका विषयात मात्र बुद्धिवादाचा उपयोग करावयास तयार नसतात.’ असा समाज सभोवताली असताना लैंगिकतेचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करून चिकित्सा करणे हे फारच क्रांतिकारी होते. व त्याहूनही क्रांतिकारी म्हणजे त्यांनी वेळोवेळी केलेले स्त्री-लैंगिकतेवरचे भाष्य..
रधों ज्या काळात काम करत होते त्या काळात जागतिक पटलावर कामशास्त्राच्या अभ्यासाला नुकतीच सुरुवात झाली होती. हॅवलॉक एलिसचे कामशास्त्रावरील शास्त्रीय लिखाण प्रसिद्ध झाले होते. पण त्याच्या ‘स्टडीज इन सायकॉलॉजी इन सेक्स’२ या ग्रंथाला कामसंबंधांबद्दलच्या प्रचलित असलेल्या ‘इश्शबाई’ (prudery) वृत्तीमुळे इंग्लंडमध्ये प्रकाशक मिळत नव्हता. शेवटी त्याला जर्मनी व अमेरिकेतून या पुस्तकाचे खंड छापावे लागले. लैंगिकतेच्या लिखाणाचा स्वीकार करण्यास आधुनिक म्हटले जाणारे देशही कचरत होते व अशा पार्श्वभूमीवर रुढीग्रस्त पारंपरिक समाजात स्त्री-लैंगिकतेबाबत जागृती करणे हे तर कल्पनेपलीकडचे होते. नाही म्हणायला स्त्री-लैंगिकतेबाबतचे काही सिद्धांत सिग्मंड फ्रॉईडने मांडले होते. पण त्यातून स्त्रीबद्दलचे पूर्वग्रहच प्रामुख्याने निदर्शनास येत होते. जागतिक पातळीवर होणार्‍या या घडामोडींची रधों बारकाईने नोंद घेत होते हे त्यांच्या लिखाणातून दिसून येते. पण ते त्यांचे अंधानुकरण करत नव्हते, तर स्त्री-लैंगिकतेबाबतची त्यांची मते ही स्वतंत्र अभ्यासातून व तर्काच्या कसोटीवर घासूनपुसून घेतलेली होती. म्हणूनच वेळप्रसंगी ते एलिसला जुन्या मतांचे आहेत म्हणून फटकारताना दिसतात व फ्रॉईडची मतेही ते सारासार विचार करूनच मांडतात. खुद्द फ्रॉईडलाही जिथे पुरुषप्रधान मानसिकतेची झापडे दूर करता आली नव्हती, तिथे कुठल्याही मानसिकतेला शरण न जाता विवेकवादाचा कस लावून रधोंनी व्यक्त केलेली मते जास्तच झळाळून दिसतात.
पुरुषप्रधान संस्कृतीत होणारी स्त्रीची गळचेपी, स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष समानता अशा विषयांवर लोकजागृती करणारे व त्यावर काम करणारे समाजसुधारक त्या काळात आजूबाजूला होते. पण स्त्री-लैंगिकतेसारख्या विषयाला हात घालणे ही फारच उत्तुंग झेप होती. फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पटलावरही कामशास्त्राबाबत पुरेशी जागृती येणे बाकी होते व स्त्री-लैंगिकतेचे दालन अजून खुलेही झाले नव्हते, अशा काळात या अस्पर्श विषयावर जाहीरपणे लिहिणे हे केवळ धार्ष्ट्याचेच नव्हते तर ते काळाच्या कित्येक पावले पुढे असल्याचेही द्योतक होते.
रधोंनी स्त्रीचा ‘व्यक्ती’ म्हणून मानवी भूमिकेतून केलेला विचार त्यांना अधिक उंचीवर घेऊन जातो. त्यांनी लैंगिकतेत स्त्री-पुरुष असा भेद केला नाही. किंबहुना या दोघांकडेही त्यांनी एक व्यक्ती किंवा मानव अशा एकात्मतेनेच पाहिले. त्यामुळे स्त्री-लैंगिकतेवर त्यांनी मुद्दाम स्वतंत्र लिखाण जाणीवपूर्वक केले नाही. स्त्रियांनी स्वत:चा वेगळा गट करणे व या गटासाठी वेगळ्या मागण्या करणे त्यांना रुचत नसे. कारण मग स्त्रियांमध्ये इतरांकडून सहानुभूती मिळवण्याची, स्वत:ला शोषित समजण्याची मानसिकता वाढीला लागते, त्यांच्या दुबळेपणाला खतपाणी घातले जाते, असे त्यांचे म्हणणे होते. शिवाय असे गट पाडल्याने समाजाच्या एकात्मतेचा भंग होतो. त्यामुळे स्त्रियांसाठी राखीव जागांची मागणी, स्त्रियांच्या खास वेगळ्या शाळा, वेगळी मासिके या सर्वांना त्यांचा विरोध होता. कामवासनेच्या बाबतीतही स्त्री-पुरुष दोघांच्याही मनात सारखेच अडसर असतात. त्यामुळे जागृती दोघांमध्येही करावयास हवी. पण धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक पारंपरिक नीतिनियम पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या बाबतीत जाचक व कडवे असल्यामुळे स्त्रियांच्या कामवासनेचा कोंडमारा जास्त होतो, असे त्यांचे निरीक्षण होते. या कोंडमार्‍याला त्यांनी सर्वप्रथम वाचा फोडली.
स्त्री-लैंगिकतेला असलेली सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शरीरशास्त्रीय अशी अनेक परिमाणे त्यांनी उलगडून दाखविली. कामवासनेचा संबंध पापाशी जोडणे, तद्नुषिक इंद्रिये अश्लील ठरविणे अशा धर्मकल्पनांवर ते तुटून पडत. विनय, पावित्र्य, कौमार्य, विनय, पातिव्रत्य अशा केवळ स्त्रियांनाच लागू असणार्‍या सामाजिक नीतिनियमांमधला दुटप्पीपणा त्यांना सहन होत नसे. त्यावर ते ते कडाडून हल्ला करत. धार्मिक कायदा पुरूषांना कसे झुकते माप देतो हे सांगताना ते म्हणतात,३ ‘हल्लीच्या धार्मिक कायद्याने स्त्रियांवर समागमाची सक्ती असते. हा रानटीपणा आहे. या बाबतीत वेश्यांस जे स्वातंत्र्य असते तेही विवाहित स्त्रियांना नसते.’ ‘स्वातंत्र्याचे पाणी अंगात मुरल्याशिवाय स्त्रियांची स्थिती कधीही सुधारणे शक्य नाही,’३ हे ते पोटतिडकीने सांगत. रधोंना अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य हे केवळ आर्थिक, शैक्षणिक अशा स्वरूपाचे नव्हते तर ते विचारांचे स्वातंत्र्य होते. स्त्री वैचारिकदृष्ट्या स्वावलंबी झाली पाहिजे, स्वत:च्या हक्कांचा लढा तिने स्वत: पुढे येऊन लढला पाहिजे, पारंपरिक बंधंनातून स्वत:ची सुटका करून घेतली पाहिजे, यासाठी ते सतत आवाहन करत. वेळप्रसंगी स्त्रियांना फटकारायलाही ते मागेपुढे पाहत नसत. ‘विवाह हा बहुतेक स्त्रियांचा धंदा असतो. त्यांस पुष्कळ वेळा स्वत:चे पोट भरण्याची अक्कल नसते व ज्यांस असेल त्यांसही विवाहामुळे अधिक सुखात राहता येईल असे वाटते किंवा स्वत:ची जबाबदारी स्वत:वर घ्यावयास नको असते.’ ३ अशा शब्दांत ते स्त्रियांना खरमरीतपणे सुनावतात. स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी स्त्रियांनी स्वत:च पुढाकार घेतला पाहिजे हे अधोरेखित करताना ते म्हणतात, ‘खुशी असेल तर लग्न करावे, नाहीतर अविवाहित राहावे. असे दोन्ही मार्ग स्त्रियांना मोकळे असले पाहिजेत. परंतु इतकी ताकद आज किती स्त्रियांच्या अंगात आहे?’४ स्त्रियांना स्वत:च्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी त्यांचे ते असे ‘बौद्धिक’ ही घेतात.
पुरुषप्रधान मानसिकतेच्या स्त्रिया वाहक बनू नयेत, नीतीच्या भ्रामक कल्पना त्यांनी उराशी बाळगू नयेत, चिकित्सा केल्याशिवाय कुठल्याही कल्पनेला मुकाट्याने शरण जाऊ नयेत यासाठी ते अशी चिकित्सा स्वत: करून दाखवत. त्यांच्या विचारांत इतकी सुस्पष्टता असे व त्यांचा तर्काचा पाया इतका भक्कम असे की त्यांचे बिनतोड युक्तिवाद खोडून काढता येणे अशक्य होई. ते म्हणतात,५ ‘ज्या स्त्रीचे नवर्‍यावर प्रेम असलं व दुसर्‍यावर नसेल, ती पतिव्रता राहिलच; पण तो मोठा सद्गुण समजणे चूक आहे. तीही स्वैरिणीच, म्हणजे आपल्या मनाप्रमाणे वागणारी, व व्यभिचार करणारीही स्वैरिणीच. एकापेक्षा दुसरी वरच्या दर्जाची समजण्याचे कारण नाही.’
स्त्रीच्या शरीरावर व मनावर केवळ तिचा स्वत:चाच हक्क असला पाहिजे, ती नवर्‍याची किंवा इतर कुणाचीही मालमत्ता नाही, हे ते ठणकावून सांगत. प्रचलित विवाहसंस्था स्त्रियांवरच्या मालकी हक्काचे कसे छुपे समर्थन करते हे सांगताना त्यांच्या लेखणीला धार येई. स्त्रीला मालमत्ता समजणार्‍या व्यक्तींबद्दल अगदी ते तिचे वडील असले तरी ते भीडभाड ठेवत नसत. एका लेखात ते म्हणतात,६ ‘स्वत:च्या मुलीचा संबंध तिच्या मर्जीविरुद्ध अयोग्य माणसाशी जुळवणारे बाप वेश्यांच्या मध्यस्थांपेक्षाही नीच दर्जाचे आहेत.’
रधोंनी मुक्त समागम-स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. दोन व्यक्तींची परस्परसंमती असेल तर कायद्याला त्यांच्या सुखाच्या आड येण्याचे कारण नाही, अशी त्यांची भूमिका होती. समागम हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे. स्त्रियांनाही लैंगिक स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी ते आग्रही होते. संभोगसुखासाठी किंवा अपत्यप्राप्तीसाठी स्त्रीला नवर्‍याची ताबेदारी सहन करण्याची गरज नाही७ ‘कोणत्याही स्त्रीस अपत्याचा हक्क असला पाहिजे व याकरता तिला कोणाचीही गुलामगिरी पत्करावी लागता कामा नये,’८ हे ते कळकळीने सांगत. शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य अशांसारख्या गोष्टींत स्त्रीने स्वतंत्र होण्याचे महत्व तर त्यांनी विशद केलेच, पण लैंगिकतेच्या बाबतीतही ती स्वतंत्र असली पाहिजे, असा आग्रह ते धरत. स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला. स्त्रियांचे आर्थिक स्वातंत्र्यही ज्या काळात समाजाच्या पुरेसे पचनी पडले नव्हते, त्या काळात स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याचा आग्रह धरणे हे त्यांच्या द्रष्टेपणाचे निदर्शक आहे.
विवाहित, एकत्र कुटुंबात राहणार्‍या स्त्रियांची लैंगिक घुसमट जशी त्यांनी शब्दबद्ध केली, तशीच एकट्या राहणार्‍या स्त्रियांच्या घुसमटीलाही त्यांनी वाचा फोडली. एकट्या स्त्रियांची लैंगिक घुसमट ही विवाहित स्त्रियांपेक्षा व एकट्या पुरुषांपेशा जास्त होत असेल हे त्यांनी समजून घेतले. ‘ज्या पुरूषांना लग्न करायचं नाही किंवा ज्यांचं लग्न होत नाही, त्यांना लैंगिक सुखासाठी वेश्या उपलब्ध असू शकतात, मग ज्या स्त्रिया लग्नं करीत नाहीत किंवा ज्यांची लग्नं होत नाहीत किंवा ज्या विधवा, परित्यक्ता आहेत, त्यांनी काय करावं? या स्त्रियांनाही स्वत:चं लैंगिक सुख घेण्याचं स्वातंत्र्य हवे,’९ असे मत व्यक्त करून एकट्या स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याचा प्रश्नही ऐरणीवर आणला. एकट्या राहणार्‍या स्त्रियांप्रमाणे वेश्यांच्या मानसिकतेचाही विचार केला. ‘आपले डोके विकणार्‍या वकिलापेक्षा वेश्येला हीन का समाजवे? असा सवाल उभा करून वेश्यांना हीन मानणे ही शिवी आहे, असे खडे बोल सुनावले. ‘वेश्या असली तरी प्रत्येकाचा कामतृप्तीचा हक्क मान्य केल्यावर तिला नीच समजण्याचे काय कारण आहे?१० असे सांगून तिच्याही लैंगिक स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. वेश्याव्यवसाय११ हे स्वतंत्र पुस्तकही लिहिले. इतक्या वेगवेगळ्या स्तरातल्या स्त्रियांच्या लैंगिकतेचा इतका खोलवर विचार त्या काळात क्वचितच कुणी केला असेल.
लैंगिकतेत स्त्रीची भूमिका निष्क्रिय असते, या गैरसमजुतीवर हल्ला करताना ते नॉर्मन हेअरच्या अभ्यासाचा दाखला देऊन म्हणतात की स्त्रियांना पुरुषांइतकीच कामवासना असते. पुरुषांच्या अतिरिक्त कामासक्तीबद्दल जशा कित्येक स्त्रिया तक्रार करतात, तशाच किंबहुना त्याहूनही जास्त स्त्रिया पुरुषांच्या अपुर्‍या कामशक्तीबद्दल तक्रार करतात.’१२ ते एवढेच सुनावून थांबत नाहीत, तर स्त्रियांना कामवासनेने कमीपणा येतो, या समजुतीची चिरफाड करतात. कामतृप्तीची लालसा फक्त पुरूषांना असते आणि याकरता पुरुषच नेहमी स्त्रीचा पाठलाग करतात ही समजूत कशी खोटी आहे हे ते सोदाहरण स्पष्ट करतात. ‘मंदकामता पुरुषांपेक्षा स्त्रियांतच जास्त सापडते’, या आधुनिकांच्या दाव्याची चिकित्सा करताना हा सामाजिक दाबाचा परिणाम असावा असे निरीक्षण व्यक्त करून जो निष्कर्ष ते काढतात तो विशेष लक्ष्यवेधी आहे. ते म्हणतात१३ की ‘स्त्रियांची कामवासना पुरुषांपेक्षा कमी किंवा जास्त असते असे म्हणण्यापेक्षा ती वेगळ्या प्रकारची असते असेच म्हटले पाहिजे.’ कामभावनेला चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, कमी-जास्त असे कुठलेही लेबल न लावणारा त्यांचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन वैज्ञानिक संशोधकाचा आहे हे निश्चित!
कामवासनेला नीती-अनीतीच्या, पाप-पुण्याच्या तराजूत तोलण्यास ते कडाडून विरोध करत. लैंगिक नीतीची त्यांची भूमिका अगदी सडेतोड आहे. ‘कोणावरही जुलूम होता कामा नये, रोगांचा प्रसार होऊ नये व सामाजिक दृष्टीने अनिष्ट संतती होता कामा नये.’१४ ही नीती स्त्री-पुरुष दोघांसाठीही समान आहे. ते म्हणतात, ‘कोण किती जेवतो यावरून जशी कोणाची किंमत ठरवणे योग्य नाही, त्याचप्रमाणे कोणाचा किती स्त्रियांशी किंवा पुरुषांशी संबंध आहे, यावरून कोणाचीही किंमत कमी किंवा जास्त होत नाही.’१५ थोडक्यात कामवासनेवरून स्त्री-पुरुषांवर शिक्के मारणे, किंवा त्यांना कुठल्याही चौकटीत कोंबणे कसे चुकीचे आहे, व कामक्षुधेला वेगळे नियम न लावता तिला झोप, भूक अशा इतर क्षुधांसारखेच समजले पाहिजे, हे त्यांचे तर्कशुद्ध प्रतिपादन निश्चितच मननीय आहे.
स्त्री-लैंगिकतेचे अनेकविध पैलू त्यांनी लिखाणातून वेळोवेळी विशद केलेच, परंतु शरीरस्वच्छता हाही लैंगिक नीतीचा एक भाग आहे,१६ असा अभिनव सिद्धांत मांडून लैंगिक नीतीला अजून एक व्यापक परिमाण दिले. शरीरस्वच्छता हा घटक कामसंबंधांत सहसा दुर्लक्षिला जातो. त्याकडे लक्ष वेधून गुदद्वाराची, जननेंद्रियांची, तोंडाची स्वच्छता कशी राखावी हे सांगून त्यांचे निरोगी कामजीवनातले महत्व ते वर्णन करतात. पुरुष जर अशी स्वच्छता पाळत नसतील, तोंड नीट धुवत नसतील तर स्त्रियांना शरीरसंबंधांत कसा त्रास होऊ शकतो, याचं वास्तवदर्शी चित्रण करतात, स्त्रियांच्या भूमिकेत शिरून त्यांना असा त्रास होत असावा व त्यामुळे त्यांची कामवासना विझून जात असावी, याचे त्यांनी केलेले विश्लेषण १७ थक्क करते.
रधों मांडत असलेले शरीरस्वच्छतेचे महत्व त्यांनी केलेल्या नग्नतेच्या पुरस्कारातूनही दिसून येते. दिवसातून काही काळ नग्न राहणे हे शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कसे फायद्याचे आहे याचे अनेक दाखले ते देतात. पण ते पुरस्कृत करत असलेल्या नग्नतेला शरीरशास्त्रीय परिमाणाबरोबरच तात्विक परिमाणही आहे. नग्नता अश्लील नसून ती सत्याचेच रूप आहे,१८ असे प्रतिपादन ते करतात. सत्य हे पूर्ण नग्नच असले पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. कपड्यांमुळे स्त्री-शरीराबद्दल फाजील उत्सुकता निर्माण होते. अश्लीलतेचे मूळ त्यातच आहे. या मुळावरच घाला घालण्यासाठी रधोंनी अजून एक धाडसी पाऊल उचलले. ते म्हणजे- समाजस्वास्थ्याच्या मुखपृष्ठावर नग्न स्त्रीचे चित्र छापण्यास त्यांनी सुरुवात केली. स्त्री-शरीराकडे पाहताना अश्लीलतेचे भूत मानगुटीवरून उतरवून निकोप दृष्टीने पाहता यावे म्हणून त्यांनी केलेले हे धाडस अभूतपूर्व होते. मात्र त्याचा परिणाम असा झाला की आधीच मासिकाचा प्रक्षोभक विषय, त्यात आता नग्न मुखपृष्ठाची भर, त्यामुळे समाजस्वास्थ्याचा अंक घरी ठेवणे किंवा चारचौघांत वाचणे, सर्वसामान्य वाचकांना अवघड झाले. रधोंनी उचलललेल्या या पावलाबद्दल भागीरथीबाई ताम्हनकर किंवा गिरीजा केळकर यांसारख्या काही स्त्रियांनी आक्षेप नोंदवला तरी त्या स्त्रियांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत, असे म्हणणे कठीण आहे. कारण काही विचारी स्त्रिया समाजस्वास्थ्य मासिकाच्या भूमिकेस अनुकूलताही दर्शवत होत्या.१९ याचा अर्थ रधोंची मते व भूमिका थोड्याफार प्रमाणात तरी तत्कालीन स्त्रियांपर्यंत पोहोचत होती, असे मानण्यास जागा आहे.
रधोंनी टिपलेला स्त्री-लैंगिकतेचा एक लक्ष्यवेधी पैलु म्हणजे स्त्रिया कामतृप्तीचा उत्कर्षबिंदु कसा गाठू शकतात याबद्दलचे त्यांनी केलेले विवेचन. स्त्री-लैंगिकतेचे शरीरशास्त्रीय परिमाण त्यांनी किती खोलात जाऊन अभ्यासले होते, ते यावरून दिसून येते. ते म्हणतात,२० ‘स्त्रीचा सर्वात चेतनाशील भाग म्हणजे गर्भाशयमुख नसून योनिलिंग असते व बहुतेक स्त्रियांस त्याच्या व योनिमार्गाच्या घर्षणाने सुख होते.’ रधोंनी clitoris ला योनिलिंग हा चपखल शब्द वापरला आहे. ज्या काळामध्ये कामतज्ञांमध्येही स्त्रियांना योनिघर्षणानेच उत्कर्षबिंदु येतो, अशी समजूत प्रचलित होती व अनेक कामतज्ञ योनिघर्षणाद्वारे मिळणारा ऑरगॅझम हा योनिलिंगाच्या ऑरगॅझमपेक्षा श्रेष्ठ समजत होते, अशा काळात स्त्रियांना या दोन्ही मार्गांनी मिळणारे सुख हे अत्युच्च असते, हे मत नोंदवणे म्हणजे द्रष्टेपणाची कमाल मर्यादा आहे. पुढे ५०-६० च्या दशकात त्यांचे हे निरीक्षण शास्त्रीय पुराव्यावर सिद्ध झाले. पण त्याचे सुतोवाच रधोंनी दोन दशके आधीच कसे केले होते, त्यासाठी त्यांनी कुठले संदर्भ ग्रंथ वापरले होते, का स्त्रीच्या शरीररचनेचा व प्रतिसादांचा अभ्यास बारकाईने करून निरीक्षणाच्या आधारावर हे मत व्यक्त केले होते, का हे एक कोडेच आहे. ‘आधुनिक कामशास्त्र’२१ पुस्तकात तर त्यांनी स्त्री-जननेंद्रियांच्या रचनेबद्दल, तिच्या अंर्तस्त्रावांबद्दल, तिच्या कामोद्दीपनाबद्दल, कामचेतनेच्या पायर्‍यांबद्दल, रतिक्रियेत तिला येणार्‍या अडचणींबद्दल, योनिमार्गाच्या स्वच्छतेबद्दल इतके काटेकोर व विस्तृत विवेचन आहे की आधुनिक स्त्रियांनाही स्वत:च्या शरीरप्रक्रियांची इतकी तपशीलवार माहिती नसावी.
लैंगिकतेच्या अभ्यासात मानदंड ठरलेले अल्फ्रेड किन्से (१९५३), मास्टर्स व जॉन्सन (१९६६), शिआ हाइट (१९७६) यांचे अभ्यास नंतरच्या काळात जगापुढे आले, तेव्हा रधों हयात नव्हते. पण त्यांचे निष्कर्ष पाहिले तर रधोंची स्त्री-लैंगिकतेबद्दलची कितीतरी निरीक्षणे अचूक होती, याचा पडताळा मात्र येतो व त्यांच्या कार्याची महती अजूनच दृढ होते. उदाहरणार्थ, स्त्रियांना योनिघर्षणाद्वारे मिळणारा ऑरगॅझम व योनिलिंगाद्वारे मिळणारा ऑरगॅझम यात फरक नसल्याचे मास्टर्स व जॉन्सन यांच्या अभ्यासात सिद्ध झाले. स्त्रियांची कामवासना पुरुषांपेक्षा कमी असते ही समजूत किन्सेच्या अभ्यासात चुकीची ठरली. स्त्री-लैंगिकतेतील सामाजिक व सांस्कृतिक घटकांचे महत्व हाइट यांनी सिद्ध केले. वैद्यकीय पदवी हाताशी नसताना, अभ्यासाची विशेष साधने उपलब्ध नसताना, आर्थिक पाठबळ नसताना, लैंगिकतेबद्दल उघडपणे न बोलणारा व या कार्याची प्रशंसा तर दूरच राहो पण पावलोपावली अडथळे निर्माण करणारा समाज भोवताली असताना, माहितीचा विस्फोट न झालेल्या त्या काळात रधोंनी स्त्री- लैंगिकतेचा अभ्यास कसा केला असेल व इतकी अचूक निरीक्षणे कशी काढली असतील याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. रधोंच्या कार्यात एकनिष्ठतेने साथ देणार्‍या त्यांच्या पत्नी मालतीबाई किंवा त्यांच्या कार्याशी समरस झालेल्या शकुंतलाबाई यांनी स्त्रियांचे लैंगिक अनुभव गोळा केले होते का, याचीही माहिती आढळून येत नाही. त्यामुळे रधोंच्या अभ्यासाचे माहितीस्त्रोत काय हे गुलदस्त्यातच राहिले आहे.
स्त्री-लैंगिकतेची अनेकविध परिमाणे समर्थपणे हाताळणारी रधोंची लेखणी स्त्री-लैंगिकतेच्या मानसिक परिमाणांबाबत मात्र मौन बाळगते. समाजस्वास्थ्य मासिक सुरू करताना, ‘व्यक्तीच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची चर्चा व तत्संबंधी उपायांची चर्चा करणे हा मासिकाचा उदेश असल्याचे त्यांनी म्हटले असले२२ तरी मानसिक आरोग्यावर त्यांनी फार कमी भाष्य केले आहे. किंबहुना मानसिकता ही शरीरशास्त्रीय घटकांतून निपजली असल्यामुळे तिचा वेगळा विचार करण्याची गरज त्यांना वाटली नसावी. म्हणूनच ‘मनुष्याचा स्वभाव आणि त्याची वागणूक ही सर्वस्वी अंत:स्त्रावांवर अवलंबून असतात’, किंवा मन हे शरीराहून वेगळे नसून शरीराच्या गुणधर्माचाच परिणाम होय,’२३ अशी मते ते व्यक्त करतात. ‘बीजकोशांच्या अंत:स्त्रावांमुळे कामवासना निर्माण होते व एकदा वाढ झाल्यावर मेंदूत व पृष्ठमज्जारज्जूंत यासंबंधी विशिष्ट केंद्रे उत्पन्न होतात व यानंतर कामवासना मानसिक परिस्थितीवर बरीच अवलंबून राहते,’२४ असा ओझरता उल्लेख ते करत असले तरी ही मानसिक परिस्थिती कुठली याच्या विवेचनाला मात्र फाटा देतात. ती केली असती तर स्त्री- लैंगिकतेची मानसशास्त्रीय बाजूही सामोरी आली असती. किंबहुना ते पुढे असाही उल्लेख२५ करतात की ‘कामवासनेवर मन:स्थितीचा परिणाम होतो, परंतु मानसिक व शारीरिक या दोहोंत भेद करणे शक्य नसते.’ यावरून त्यांना मानसशास्त्रात रुची नसावी असे दिसते. फ्रँक केनियन यांच्या ‘मिथ ऑफ द माईंड’ या पुस्तकाच्या आधारे त्यांनी जी लेखमाला लिहिली आहे,२६ त्यामध्ये ‘मानसशास्त्राचा पाया म्हणजे काल्पनिक मन’ असे नोंदवून हा पायाच ठिसूळ असल्याचे नोंदवतात.
पण रधोंची ही मते काळाच्या चौकटीतून पाहिली तर मात्र खुपणार नाहीत. आज मानसशास्त्राने जी मजल गाठली आहे ती त्यांच्या काळात गाठली नव्हती. किंबहुना ज्या काळात रधोंची लेखणी चौखुर उधळत होती, त्या काळात मानसशास्त्राला नुकतेच कुठे बाळसे धरत होते. ते अजूनही बाल्यावस्थेतच होते. वर्तनवाद्यांचा stimulus-response (S-R) सिद्धांत जगावर आधिपत्य गाजवत होता. या सिद्धांताप्रमाणे उत्तेजकाला दिलेला प्रतिसाद म्हणजे आपले वर्तन. मानसिकतेचा वेगळा विचार त्यात नव्हता. तो नंतर होऊन S व R च्या मध्ये O म्हणजे organism आला. परंतु तत्कालीन उपलब्ध माहितीच्या आधारावर रधोंची मते बेतली असण्याची शक्यता आहे. परंतु आजच्या काळात रधों असते तर त्यांनी स्त्री-लैंगिक मानसिकतेचे विवेचन नक्कीच उद्बोधक केले असते, यात शंकाच नाही.
रधोंनी स्त्री-लैंगिकतेच्या अनुषंगाने मांडलेली अनेक मते विवाद्य ठरली. वादाच्या भोवर्‍यातही तर किती अडकली असतील याची गणतीच नाही. त्यांच्या लिखाणावर भरले गेलेले अश्लीलतेचे खटले गाजले व त्यातून ते तावून सुलाखून बाहेरही पडले. स्वातंत्र्याला पायबंद घालणारा कुठलाही निर्बंध दृष्टोत्पत्तीस पडला की त्यांची सत्यान्वेषी विवेक्षशक्ती धडधडून पेटून उठे. विवाहसंस्था स्त्री-पुरुषांच्या, विशेषत: स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याचा संकोच करते म्हणून त्यांनी तिला कडवा विरोध केला. विवाहसंस्था ही वेश्या व्यवसायापेक्षाही कमी दर्जाची आहे, कारण वेश्येला नाही म्हणण्याचे तरी स्वातंत्र्य असते तेही पत्नीला नसते, अशी जहाल विधानेही केली. लैंगिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय स्त्री खर्‍या अर्थाने मुक्त होणार नाही, म्हणून तिच्या लैंगिक स्वातंत्र्याचा हक्क न डगमगता वेळोवेळी उचलून धरला. स्त्रीच्या स्वत:च्या कुठल्या गुणाचा उपयोग कुठे आणि कशासाठी करावयाचा याचे स्वातंत्र्य स्त्रीला असावयास पाहिजे, मग ते तिचे शरीर असो नाहीतर बुद्धी, त्यास नीती-अनीतीच्या चाळण्या लावू नये, ही भूमिका कायम ठेवली. निरोगी स्त्री-लैंगिकतेमध्ये केंद्रस्थानी असलेल्या स्वेच्छा व स्वातंत्र्य या दोन्हींचा पाठपुरावा त्यांनी अखेरच्या श्वासपर्यंत केला.
रधोंनी सुरू केलेल्या कार्यास आता शंभर वर्षं उलटून गेली आहेत. निदान आज तरी त्यांचे विचार आपण पेलवू शकलो आहोत का? शंभर वर्षांपूर्वी होता तसाच चोरटेपणा कामसंबंधात अजूनही आहे. लैंगिकता म्हणजे पाप ही समजूत तशीच टिकून आहे. अश्लील भावनाही तशीच आहे. उलट अश्लीलतेला नवीन नवीन परिमाणे मिळत आहेत. आज किती स्त्रिया कुठल्याही अडसरांशिवाय लैंगिकतेची खुलेपणाने चर्चा करू शकतात? त्याबद्दल स्वतंत्र मते मांडण्याचे धाडस दाखवू शकतात? मग रधोंना अभिप्रेत असणारे स्त्रीचं लैंगिक स्वातंत्र्य तर कोसों दूर आहे. प्रश्न विचारणेच जिथे कुलूपबंद होत आहे, तिथे रधोंसारखी तर्कशुद्धता रुजणार कशी? कौमार्य, पावित्र्य, विनय अशा ज्या धर्मकल्पनांवर रधोंनी आसूड ओढले होते त्याच आता संस्कृतीच्या मखरात बसून नव्याने साजर्‍या होत आहेत. बाह्य रूपाबाबत स्त्रियांची सजगता वाढली आहे. पण रधों म्हणत होते त्या शरीरांतर्गत स्वच्छतेचं काय? त्याबाबतची जागृती अजूनही प्राथमिक अवस्थेतच आहे. कामसाहित्याचा महापुर उसळला आहे. पण त्यामुळे लैंगिकतेबद्दलचा दृष्टीकोन प्रगल्भ झाला आहे का अजून मागास? अशा साहित्यात स्त्रीला एक मानव म्हणून पाहिले जाते का भोगवस्तू म्हणून? लैंगिकतेबद्दल काठाकाठाने बोलले जात आहे, पण रधोंसारखी त्या विषयात थेट बुडी मारण्याची हिंमत व धाडस आज कुणी का दाखवू शकत नाही?
रधोंचे विचार पेलवणे तेव्हाही सोपे नव्हते आणि अजूनही नाही. पण आज रधों वाचताना वाटते की त्यांचा प्रत्येक शब्द आजही तितकाच लागू आहे. त्यांची निरीक्षणे तितकीच अचूक आहेत. त्यांचा बिनतोड युक्तिवाद खोडून काढता येणे आजही कठीण आहे आणि त्यांची कळकळ आजही तितकीच आतपर्यंत भिडणारी आहे. आजूबाजूला काळोख पसरला असताना विवेकवादाची मशाल त्यांनी समर्थपणे पेटती ठेवली. पण आज दुर्दैवाने असे म्हणावेसे वाटते की शंभर वर्षं उलटून गेली तरी आज समाजात गाभ्यातले बदल झालेच नाहीत. शंभर वर्षांपूर्वी आपण जिथे होतो तिथेच आहोत. उलट काही पावले मागेच गेलो आहोत. आजही तसाच काळोख आहे. उलट तो अजून मिट्ट झाला आहे. त्यातून माग काढत पुढे जायला रधोंच्या समर्थ लेखणीचे हात मात्र आज नाहीत. विवेकवादाची मशाल दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. ती पेटती ठेवण्यासाठी १०० वर्षांपूर्वीच्या समाजाला रधोंची जितकी गरज होती त्याहीपेक्षा जास्त गरज आजच्या समाजाला आहे.

संदर्भ

1. बापट दिवाकर. (१९७१). उपेक्षित द्रष्टा. अभिनव प्रकाशन, प्रथमावृती. पृष्ठ २७.
2. Ellis Havelock (1936). ‘Studies in the psychology of sex’ New York, Random House.
3. कर्वे, र. धों, (जून, १९३१) ‘कामशास्त्राचा सामाजिक विचार.’ समाजस्वास्थ्य, पृष्ठ २६७
4. आठलेकर मंगला (२०१२ ). महर्षी ते गौरी. राजहंस प्रकाशन. चौथी आवृत्ती, पृष्ठ ७७
5. कर्वे, र. धों, (सप्टेंबर, १९३१) ‘व्यभिचाराचा प्रश्न’. समाजस्वास्थ्य, पृष्ठ ५८
6. कर्वे, र. धों, (डिसेंबर, १९३३) ‘आजची विवाहसंस्था’. समाजस्वास्थ्य, पृष्ठ १४६-१४७
7. कर्वे, र. धों, (सप्टेंबर १९३१) ‘व्यभिचाराचा प्रश्न’. समाजस्वास्थ्य, पृष्ठ ५७
8. कर्वे, र. धों, (डिसेंबर, १९३१) ‘आजची विवाहसंस्था’. समाजस्वास्थ्य, पृष्ठ १४४
9. आठलेकर मंगला (२०१२ ). महर्षी ते गौरी. राजहंस प्रकाशन. चौथी आवृत्ती, पृष्ठ ७३
10. कर्वे, र. धों, (ऑगस्ट, १९५१) ‘स्त्री-पुरूषांचे परस्पर-संबंध’ समाजस्वास्थ्य, पृष्ठ २२
11. कर्वे, र. धों, (उपलब्ध नाही) वेश्याव्यवसाय. मुद्रक. जी. जी. पाठारे
12. कर्वे, र. धों, (जुलै, १९५१) ‘स्त्री-पुरुषांची तुलना’ समाजस्वास्थ्य, पृष्ठ १
13. कर्वे, र. धों (१९६२) ‘आधुनिक कामशास्त्र’ देशमुख आणि कंपनी. सहावी आवृत्ती. पृष्ठ ४६
14. कर्वे, र. धों, (डिसेंबर, १९३३) ‘आजची विवाहसंस्था’. समाजस्वास्थ्य, पृष्ठ १४४
15. कर्वे, र. धों, (जून ,१९४७ )’विवाहाचा प्रश्न’ समाजस्वास्थ्य, पृष्ठ २४८
16. कर्वे, र. धों, (जून, १९३१) ‘कामशास्त्राचा सामाजिक विचार.’समाजस्वास्थ्य, पृष्ठ २७०
17. कर्वे, र. धों, (जून, १९३१) ‘कामशास्त्राचा सामाजिक विचार. समाजस्वास्थ्य, पृष्ठ २७१
18. देशमुख, अनंत (२०१०) ‘समाजस्वास्थ्यकार र.धों.’. पद्मगंधा प्रकाशन. पहिली आवृत्ती. पृष्ठ ८६
19. कित्ता. पृ. क्र. ९२
20. कर्वे. र. धों, (डिसेंबर, १९३१) ‘अजब कैफियत’. समाजस्वास्थ्य, पृष्ठ १७३
21. कर्वे, र. धों (१९६२) ‘आधुनिक कामशास्त्र’ देशमुख आणि कंपनी. सहावी आवृत्ती.
22. कर्वे, र. धों, (जुलै, १९२७ ) ‘आमचा उद्देश’ समाजस्वास्थ्य, पृष्ठ १
23. कर्वे, र. धों (१९६२) ‘आधुनिक कामशास्त्र’. देशमुख आणि कंपनी. सहावी आवृत्ती. पृ. क्र. ६
24. कर्वे, र. धों, (जुलै, १९३०) ‘कामवासनेची मीमांसा-१’. समाजस्वास्थ्य, पृष्ठ १
25. कर्वे, र. धों, (ऑगस्ट, १९३०) ‘कामवासनेची मीमांसा-२’. समाजस्वास्थ्य, पृष्ठ ३२
26. सूर्यवंशी, उमेश (२०२२) ‘एकटा’ प्रयास पब्लिकेशन्स, प्रथम आवृत्ती, पृष्ठ ४९