रघुनाथ धोंडो कर्वे – एक अग्रगण्य समाजसुधारक

रघुनाथ धोंडो कर्वे हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य समाजसुधारक होते. ते महर्षी कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र असून त्यांचा जन्म १८८२ साली झाला. महर्षी कर्व्यांनी स्त्रीशिक्षणाचे मोठे कार्य उभे केले, तसेच विधवा पुनर्विवाहाची चळवळदेखील चालवली. रघुनाथ कर्वे यांनी आपल्या वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवला. ते विलक्षण बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ होते. मुळात स्वतः गणिताचे प्राध्यापक असूनही नंतर त्यांनी संततिनियमन आणि कामशास्त्र या विषयांचा खोलवर अभ्यास केला. पुढे त्यासाठी प्रचारकार्यात उतरून त्यांनी समाजातील एका महत्त्वाच्या, परंतु दुर्लक्षित विषयाला हात घातला. लोकांना या विषयाची शास्त्रशुद्ध माहिती व्हावी म्हणून त्यांनी ‘संततिनियमन’ आणि ‘गुप्तरोगापासून बचाव’ ही पुस्तके लिहिली. त्यानंतर लोकशिक्षण आणि प्रबोधन या हेतूने ‘समाजस्वास्थ्य’ नावाचे मासिक काढले. जुलै १९२७मध्ये ‘समाजस्वास्थ्य’चा पहिला अंक निघाला. या अंकात हे मासिक सुरू करण्यामागचा आपला उद्देश रघुनाथरावांनी सांगितला होता. ‘व्यक्तींच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची’ व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयासंबंधी लेख इतर पत्रकार छापत नाहीत असे विषय कितीही महत्त्वाचे असले, तरी त्यासंबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकांस अतिशय अडचण पडते. ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. यात तत्त्वज्ञानाचा खल न करता व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल.’ २६ वर्षे ४ महिने एवढा दीर्घकाळ चालून अखेर १९५३ साली त्यांच्या मृत्यूनंतर हे मासिक बंद पडले.
या मासिकातील अश्लीलता, व्यभिचाराचे प्रश्न यासंबंधीचे त्यांचे विचार पेलणे आजही समाजाला अवघड जाते. तेव्हाच्या समाजाला तर ते मुळीच पचले नाहीत. केवळ संततिनियमनाचीच नव्हे, तर सर्वच लैंगिक प्रश्नांच्या बाबतीत बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतून निकोप व निर्भय चर्चा व्हावी, असा रघुनाथरावांचा आग्रह असे. अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, सदराचा किंवा इतर वस्तूचा गुण नसतो, तो फक्त तसा आरोप करणाऱ्याच्या मनाचा गुण आहे, हे ते सतत ठासून सांगत. स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य असले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. यावरून अनेक वाद झाले. अनेक सनातनी लोकांनी त्यांच्या कामात अडथळे आणले, सरकारने त्यांच्यावर खटले भरावेत म्हणून प्रयत्न केले. त्याप्रमाणे त्यांच्यावर खटले भरलेही गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वतीने काही खटले लढवले. काही खटल्यांमध्ये रघुनाथरावांना शिक्षा झाली. मात्र बराच तोटा सहन करूनही ते आपल्या मूळ कार्यापासून ढळले नाहीत.
लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता. संततिनियमनाची पुरेशी साधने, शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत. त्यामुळे स्त्री-आरोग्यावर गंभीर परिणाम होत असत. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावत असे. खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटू लागे. अशा भीतीमुळे मानसिक विकृती निर्माण होई. त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. वेश्यागमनातून बऱ्याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करत. लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या रघुनाथरावांनी या सर्व समस्यांवर कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनातून मते मांडली होती. लैंगिकतेविषयी मूलगामी विश्लेषण करून सतत सत्तावीस वर्षे त्यांनी एकाकी लढत दिली होती. त्यांच्या प्रकाशित झालेल्या साहित्यांत – आधुनिक आहारशास्त्र, आधुनिक कामशास्त्र, गुप्त रोगांपासून बचाव, त्वचेची निगा, वेश्याव्यवसाय, संततिनियमन, संततिनियमन– विचार व आचार, इत्यादींचा समावेश आहे. मुंबईतील तेव्हाच्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारांच्या तरुणांनी ‘द रॅशनलिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्था स्थापन केली होती. त्यांनी ‘रीझन’ नावाचे इंग्रजी नियतकालिक सुरू केले. प्राध्यापक र.धों. कर्वे यांनी संपादक, लेखक, ग्रंथपरीक्षक, पत्रलेखक अशा विविध भूमिकांतून ‘रीझन’ ला योगदान दिले.
ते एवढ्यावरच थांबले नाहीत. स्वतःच्या पुढाकाराने त्यांनी भारतातील पहिले कुटुंबनियोजन केंद्र १९२१ साली सुरू केले. इंग्लंडमध्येदेखील याच वर्षी पहिले कुटुंबनियोजन केंद्र सुरू झाले होते. या सर्व कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी मालतीबाई कर्वे यांची मोलाची साथ लाभली. तसेच, शकुंतला परांजपे यांचा त्यांच्या कामात सक्रिय सहभाग होता. रँग्लर परांजपे, मामा वरेरकर इत्यादी लोकांचा त्यांच्या कार्याला पाठिंबा होता.

बुद्धिप्रामाण्यवाद
संपादक : डॉ. अनंत देशमुख
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
पहिली आवृत्ती: १४ ऑक्टोबर २०१०

असंग्रहित : र.धों.कर्वे
प्रस्तावना:डॉ. अनंत देशमुख
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
पहिली आवृत्ती: १४ ऑक्टोबर २०१०

'समाजस्वास्थ्य 'कार
संपादक:डॉ. अनंत देशमुख
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
पहिली आवृत्ती: १४ ऑक्टोबर २०१०

शेष समाजस्वास्थ्य
संपादक:डॉ. अनंत देशमुख
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
पहिली आवृत्ती: १४ ऑक्टोबर २०१०

निवडक 'शारदेची पत्रे'
संपादक व लेखक:डॉ. अनंत देशमुख
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
पहिली आवृत्ती: १४ ऑक्टोबर २०१०

मोपांसाच्या कथा
संपादक : डॉ. अनंत देशमुख
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
पहिली आवृत्ती: १४ ऑक्टोबर २०१०

'समाजस्वास्थ्य' मधील निवडक लेख
प्रस्तावना:डॉ. अनंत देशमुख
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
पहिली आवृत्ती: १४ ऑक्टोबर २०१०

र. धों. कर्वे : मते आणि मतांतरे
संपादक:डॉ. अनंत देशमुख
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
पहिली आवृत्ती: १४ ऑक्टोबर २०१०

र.धों.कर्वे व्यक्तित्व आणि कर्तृत्व
संपादक:डॉ. अनंत देशमुख
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन
पहिली आवृत्ती: १४ ऑक्टोबर २०१०

एकटा (बहुजननायक र. धों. कर्वे विचारदर्शन)
लेखक: उमेश मुरलीधर सूर्यवंशी
प्रकाशक: प्रयास पब्लिकेशन्स
पहिली आवृत्ती: २७ मार्च २०२२

