अडगळीतले कमळ – अमोल पालेकर

र. धों. कर्वेसारख्या अडगळीत टाकलेल्या विचारवंताचे निर्भीड विचार त्यांच्या ‘समाजस्वास्थ्य’च्या अंकांमधून १९२७ ते १९५६ दरम्यान व्यक्त झाले होते. ते बसाईटच्या माध्यमातून लोकार्पण केल्याबद्दल शतशः धन्यवाद! जवळ जवळ २७ वर्षे प्रकाशित झालेल्या त्यांच्या साहित्यातील एकत्रित विचार कोणतेही संपादन न करता, जसेच्या तसे वाचकांपर्यंत सादर करणे फार मोलाचे होते. संपादन करताना स्वतःचे चष्मे आणि झालेच तर स्वतःच्या विचारधारेतील कल आणि रंग मूळ साहित्यावर लादले जाणे, हे काही आपल्याला नवीन नाही. ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या इतक्या वर्षांच्या मौलिक योगदानानुसार हे अजून एक समाजाभिमुख बुद्धिवादी पाऊल! पुन्हा एकदा अभिनंदन. २००१ साली, रधोंच्या जीवनावर मराठीत ‘ध्यासपर्व’ आणि हिंदीत ‘कल का आदमी’ हे चरित्रपट बनवताना, आम्हाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची फार मोठी मदत झाली होती. तरीसुद्धा तेव्हा अशी एखादी बोटाच्या टिपेवर उपलब्ध असलेली वेबसाईट असती तर साहित्य सामग्री जमवण्यासाठी घेतलेले शारीरिक कष्ट आणि खर्ची घातलेला वेळ, दोन्ही वाचले असते.
रधोंच्या उभ्या हयातीत त्यांची आणि त्यांच्या विचारांची अवहेलनाच केली गेली; खंत याची वाटते की आजसुद्धा, मूठभर डोकी सोडली तर, त्यांच्या विवेकनिष्ठ विचारांना सामोरे जाण्याचे धैर्य आपल्यामध्ये नाही, असंच म्हणावं लागेल. आजचा सामाजिक-वैचारिक अवकाश ज्या झपाट्याने गढूळला गेला आहे त्यावर नजर टाकली आणि आत्मपरीक्षण केले तर, येणाऱ्या पिढ्यांमध्येसुद्धा रधोंच्या कालातीत प्रगल्भ विचारसरणीला आत्मसात करण्याची हिंमत असेल वा नाही याविषयी शंकाच वाटते. साधारण १९२०च्या दशकात, त्या काळातील समकालीन ललित आणि वैचारिक साहित्य लक्षात घेतले तर रधों चे नाणे किती खणखणीत आणि लखलखीत होते हे लक्षात येते. मात्र समाजाचे- आपले दुर्दैव असे की ते नाणे चलनात येऊ दिले नाही. We failed him!
जेव्हा ना. सी. फडक्यांसारखे सिद्धहस्त लेखक शारीरिक प्रणयाची भावोत्कट वर्णने करून मराठी वाचकांचे स्वप्नरंजन करत होते किंवा पिवळ्या वेष्टनाची पुस्तके शहरी मध्यमवर्गीयांची कामोत्सुकता चाळवत होती, तेव्हा रधों लैंगिक विषयांवर बुद्धिप्रामाण्यवादी आणि शास्त्रीय पद्धतीने लिहून समाजाचे उन्नयन करत होते. महत्वाची बाब ही की, त्या समाजप्रबोधनात कोणताही आव नव्हता तर विज्ञाननिष्ठ आस होती. जेव्हा अमेरिकेत मेरी स्टोप्स आणि ब्रिटनमध्ये मार्गारेट सँगर birth control ची चळवळ सक्रिय करत होत्या, तेव्हा आपल्याकडे family planning वा birth control हे शब्दसुद्धा जाहीरपणे उच्चारणे निषिद्ध होते. तेव्हाच रधों आणि मालतीबाईंनी भारतात लैंगिक समस्यांसाठी पहिले क्लिनिक सुरू केले. इतकेच नाही तर, ‘संततीनियमन’ हा शब्ददेखील या दांपत्याने प्रचलित केला. पण समाजाने मात्र टीका आणि हेटाळणीच सातत्याने त्यांच्या पदरी घातली. जवळजवळ २७ वर्षे तन-मन-धन एकवटून हा ध्यास जगणे किती विलक्षण होते याची जाणीव तरी आज आपल्यामध्ये जिवंत रहावी एवढीच अपेक्षा आहे.
रधोंच्या संपूर्ण साहित्यातून आणि जगण्यातून अजून एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे त्यांचा स्त्री- स्वातंत्र्याविषयीचा, स्त्री-पुरुष समानतेविषयीचा प्रगल्भ विचार! १९७३मध्ये अमेरिकेत ‘रो विरुद्ध वेड’मध्ये गर्भपातविषयक स्त्री हक्कांच्या संदर्भात दिला गेलेला निकाल, आज अमेरिकन सर्वोच्च न्यायालयासमोर पुनर्विचारासाठी ठेवला गेला आहे. तर शंभर वर्षांपूर्वी रधों समाजाला सांगत होते की, “अपत्य हवे की नको, हवे असल्यास कधी आणि कुणापासून, हे ठरवण्याचा हक्क फक्त स्त्रीलाच असला पाहिजे.” या पुरोगामी विचारांसाठीच पुण्यातील कर्मठ लोकांनी त्यांना चप्पल फेकून मारली होती. रधों पुढे सांगतात, “स्त्री-पुरुष लैंगिक संबंध फक्त प्रजोत्पादनासाठी नसून कामक्रीडेतील सुख अनुभवण्यासाठी असला पाहिजे आणि ते सुख अनुभवण्याचा हक्क फक्त पुरुषालाच नाही तर स्त्रीला सुद्धा आहे.” वैयक्तिक जीवनात ज्या असोशीने त्यांनी मालतीबाईंची साथ सातत्याने घेतली ते बघता, खलील जिब्रान आणि अल्मित्रा आठवतात. खेद याचा वाटतो की पुरुषसत्ताक दलदलीत असे विवेकवादी कमळ तग धरून होते, या गोष्टीचा अभिमान आपल्याला कधीच वाटला नाही. आज घडीला, महाराष्ट्रातली अशी ‘खरी कमळे आपल्यामध्ये रुजवण्याऐवजी’, चिन्हांमध्ये रुजवलेल्या प्रतिगामी मूल्यांना आपण आत्मसात केले आहे, याचे दुःख तर अपार आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी त्यांनी दिलेला अथक लढा, हा तर लक्षणीय आणि पथदर्शी होता… अगदी आजही आहे. अश्लीलतेच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे हल्ले रधोंनी तार्किक पद्धतीने परतवून लावले. १९४२ सालच्या नाशिक मराठी साहित्य संमेलनामध्ये मांडला गेलेला ‘अश्लीलता विरोधी ठराव लेखन स्वातंत्र्याला अतिशय हानिकारक आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. ‘सर्वसामान्य घरात रोजच्या संभाषणातील बोलीभाषेतसुद्धा निषिद्ध मानल्या जाणाऱ्या कित्येक शब्दांना स्थान असते तर लेखी प्रकाशित साहित्यावर समाजाचा अंकुश का असावा?’ या युक्तिवादासाठी त्यांनी उदाहरणादाखल ‘मात्रागमनी’ हा सभ्य, समाजमान्य शब्द घेतला. मात्र त्याच अर्थाचा ‘मादरचोद’ हा शब्द असभ्य शिवी मानला जातो.
मी आयुष्यभरासाठी रधोंचा ऋणी आहे. बहिष्कृत केले गेले तरी स्वतःच्या विचारांपासून अढळ राहणं याचा आदर्शच त्यांनी आपल्यापुढे ठेवला. राजकारण्यांची लाळ घोटत, शक्तीस्थानांच्या मागेपुढे घोटाळत, पक्षीय विचारप्रणालींच्या वळचणीला जाऊन स्वहित साधण्याची कला सर्वत्र जोपासली जात असताना, बुद्धीप्रामाण्यवादी, विवेकनिष्ठ आयुष्य जगण्याचे बळ मला रधोंकडून मिळाले… आजही मिळते; माझ्यासारख्या अनेकांना ते लाभो, हीच मनोमन इच्छा!