र. धों. यांच्यावरचे लेख
र धों आणि स्त्री-लैंगिकता :- अंजली जोशी
संततिनियमनाचे भारतातील आद्य पुरस्कर्ते म्हणून र. धों. कर्वे यांचे नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहे. १९२१ मध्ये पत्नी मालतीबाईंसमवेत भारतातले पहिले संततिनियमन केंद्र चालू करून त्यांनी या कार्याची मुहुर्तमेढ रोवली. त्यानंतर १९२७ मध्ये समाजस्वास्थ्य हे मासिक चालू केले. हे मासिक, ग्रंथलेखन व केंद्राद्वारे मार्गदर्शन व साधने पुरविणे अशा सर्व आघाड्यांवरून १९५३ पर्यंत म्हणजे सुमारे पंचवीस वर्षांपेक्षाही जास्त कालावधीपर्यंत या कार्याचा आलेख त्यांनी उंचावत नेला. एखादे कार्य दीर्घकाळ चालू ठेवावयाचे असेल तर त्या कार्याबाबत नुसती आस्था किंवा कळकळ असणे पुरेसे नसते, तर त्यासाठी सैद्धांतिक बैठक पक्की असावी लागते. रधोंनी अंगिकारलेली विवेकवादाची बैठक इतकी भक्कम होती की हे कार्य पुढे नेण्यास पदोपदी येणार्या अडचणी व विरोध यांना ते समर्थपणे तोंड देऊ शकले.
अडगळीतले कमळ – अमोल पालेकर
र. धों. कर्वेसारख्या अडगळीत टाकलेल्या विचारवंताचे निर्भीड विचार त्यांच्या ‘समाजस्वास्थ्य’च्या अंकांमधून १९२७ ते १९५६ दरम्यान व्यक्त झाले होत. ते बसाईटच्या माध्यमातून लोकार्पण केल्याबद्दल शतशः धन्यवाद! जवळ जवळ २७ वर्षे प्रकाशित झालेल्या त्यांच्या साहित्यातील एकत्रित विचार कोणतेही संपादन न करता, जसेच्या तसे वाचकांपर्यंत सादर करणे फार मोलाचे होते. संपादन करताना स्वतःचे चष्मे आणि झालेच तर स्वतःच्या विचारधारेतील कल आणि रंग मूळ साहित्यावर लादले जाणे, हे काही आपल्याला नवीन नाही. ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या इतक्या वर्षांच्या मौलिक योगदानानुसार हे अजून एक समाजाभिमुख बुद्धिवादी पाऊल! पुन्हा एकदा अभिनंदन. २००१ साली, रधोंच्या जीवनावर मराठीत ‘ध्यासपर्व’ आणि हिंदीत ‘कल का आदमी’ हे चरित्रपट बनवताना, आम्हाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची फार मोठी मदत झाली होती. तरीसुद्धा तेव्हा अशी एखादी बोटाच्या टिपेवर उपलब्ध असलेली वेबसाईट असती तर साहित्य सामग्री जमवण्यासाठी घेतलेले शारीरिक कष्ट आणि खर्ची घातलेला वेळ, दोन्ही वाचले असते.